दहशतवाद्याला व्हिसा मिळण्यासाठी हुर्रियत नेत्यांची मदत

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ताब्यात असलेल्या आशिक बाबा नावाच्या दहशतवाद्याला पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यात हुर्रियत कॉन्फरन्स या विभाजनवादी संघटनेच्या नेत्यांनी मदत केल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरोटा लष्करी छावणीवर हल्ला केल्याप्रकरणी बाबाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली.
नागरोटा लष्करी छावणीवरील हल्ला पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने घडवल्याची कबुली बाबाने चौकशीवेळी दिली. तो सोशल मीडियाच्या माध्यमातूून जैशच्या म्होरक्यांच्या संपर्कात होता. बाबाने 2015 ते 2017 या कालावधीत वाघा सीमा ओलांडून चारवेळा पाकिस्तानला भेट दिली. या भेटींसाठी व्हिसा मिळवण्यासाठी त्याने सैद अली शाह गिलानी, गनी बट आणि मौलाना उमर फारूक या हुर्रियत नेत्यांची शिफारस पत्रे घेतली, असे एनआयएने म्हटले आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रवासासाठी बाबाने बऱ्याच वेळा मदत केली. त्यासाठी त्याला जैशच्या म्होरक्यांनी आर्थिक बक्षीस देण्याचेही आश्वासन दिल्याचे स्पष्ट झाले. बाबाच्या चौकशीतून आणखी महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.