दलित, शेतकऱ्यांबाबत कॉंग्रेसकडून अपप्रचार

- पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
बागपत (उत्तर प्रदेश) – दलित आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॉंग्रेस पक्षाकडून अपप्रचार केला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. जे लोक देशात केवळ एका घराण्याची पूजा करतात, त्यांनीच मोदींना विरोध करायला सुरुवात केली आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. “ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे’ या 11 हजार कोटी रुपयांच्या महामार्गाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. राजकीय लाभासाठी कॉंग्रेसकडून बिनदिक्कतपणे अपप्रचार केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान बोलत होते. एका घराण्याची पूजा करणारे लोक लोकशाहीची पूजा करू शकत नाहीत. निवडणूकांमध्ये पराभव झाल्यामुळे हे लोक अस्वस्थ झाले आहेत. मात्र आपल्याला विरोध करणारे लोक देशाला विरोध करतील, असे आपल्याला वाटले नव्हते, असे मोदी म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाला कधीही लोकशाहीवर आणि लोकशाही संस्थांवर विश्वास नव्हता. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अविश्वास दाखवत सर्व विरोधी पक्षांनी मिळून निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली. रिझर्व बॅंकेच्या धोरणांवर प्रश्नही उपस्थित केले गेले आणि भारताचे कौतुक करणाऱ्या आंतरराष्टृीय संस्थांबाबतही विरोधकांनी अविश्वास दाखवला. कॉंग्रेसच्या गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या संस्थांविरोधात खोटे आरोप केले गेले. सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या लष्कराच्या शौर्यालाही हीन लेखले गेले. आता प्रसार माध्यम्ये एकांगी असल्याचा आरोप सर्व विरोधकांकडून केला जातो आहे, असे मोदी म्हणाले.
विरोधकांच्या टीकेला आपण घाबरत नाही. देशातील गरिब, दलित आणि आदिवसींच्या विकासामध्ये कॉंग्रेसच अडथळे आणत आहे. स्वच्छ भारत, स्वच्छतागृहे, बॅंक खाती, गॅस जोडणी आदी विषय कॉंग्रेसला विनोद वाटतात. स्वार्थी हेतूने प्रेरित असलेल्यांकडून आता दलितांच्या नावे अश्रु ढाळले जात आहेत. केवळ संकुचित राजकीय लाभासाठी ऍट्रॉसिटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उघडपणे खोटे बोलले जात आहे. अफवा पसरवल्या जात आहेत आणि दिशाभूल केली जात आहे, असे मोदी म्हणाले.
आपल्या सरकारने दलितांच्या हक्कांच्या रक्षणासाठीचे कायदे अधिक कठोर केले. विशेष जलदगती न्यायालये सुरू केली. मागासवर्गीयांना आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांचे लाभ मिळावेत यासाठी अल्पसंख्यांच्या उपविभागांसाठी आयोगाची निर्मितीही केली, असे मोदींनी सांगितले.