थ्रिल अनुभवण्यासाठी तरूण वळताहेत दहशतवादाकडे ?

श्रीनगर : गेल्या काही काळामध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा एक नवा पॅटर्न उदयाला येत असल्याची बाब पोलीस अहवालातून पुढे आली आहे. या अहवालानुसार दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणारे तरूण हे कोणत्याही कट्टर विचारसरणीने प्रेरित असलेले नाहीत. जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 2010 ते 2015 या काळात दहशतवादाचा मार्ग स्वीकारणाऱ्या 156 स्थानिक तरूणांच्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
हा अहवाल पारंपरिक दहशतवादाबद्दलची धारणा बदलायला लावणार आहे. त्यामुळे आता दहशतवादाच्या नव्या स्वरुपाशी कशाप्रकारे सामना करायचा, यासाठी सुरक्षा यंत्रणांनी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. या अहवालातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे दक्षिण काश्मीरचा अपवाद वगळता दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणारे तरूण हे विशिष्ट विचारसरणीने प्रेरित नाहीत. बहुतांश तरुण हे केवळ तारुण्यसुलभ रोमांच अनुभवण्याच्या भावनेतून दहशतवादाकडे वळाले असावेत, असा निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात आला आहे.