breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
थेरगावात राजकीय भूकंप, खासदार बारणेंना बालेकिल्ल्यातच सुरूंग; पार्थ पवारांचा करिष्मा

- थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा
- शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यापुढे अडचणीचां डोंगर
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगावमधील बारणे कुटुंबियांनी पाठिंबा दर्शविला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या भावभावकीतील बारणे परिवारांनी पवार यांना उघडपणे पाठिंबा दिल्याने बारणे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच सुरूंग लागला आहे. यापूर्वी याच कुटुंबियांनी खासदार बारणे यांच्या विरोधात जाऊन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्थन दर्शविले होते. नंतर बारणे आणि जगतापांचे मनोमिलन झाल्याने जगतापांच्या विरोधात जाऊन बारणे परिवारातील असंख्य सदस्यांनी पार्थ पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
- उमेदवार पार्थ पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. थेरगावात त्यांचा झंजावाती प्रचार दौरा सुरू होता. दरम्यान, खासदार बारणे यांच्यावर नाराजी व्यक्त करत बारणे यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला. या भागातून तुम्हाला लीड दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निश्चय देखील बारणे सदस्यांनी केला. निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगावमधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला. यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगावमध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र, कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आमचं आडनाव जरी बारणे असलं, तरी संपूर्ण थेरगावमधील बारणेंचा पाठिंबा हा पार्थ पवार यांनाच असणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी थेरगावमधील सर्व बारणे हे आपली ताकद पणाला लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.