‘त्या’ दाम्पत्याला मुलाच्या हट्टाने आणले एकत्र

गाझियाबाद : तीन वर्षापासून वेगळे राहत असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलाच्या हट्टामुळे एकत्र आले आहेत. कोर्टामध्ये आईबरोबर आलेल्या मुलाने वडिलांकडे जाण्याचा हट्ट केल्याने या दाम्पत्याला त्यांच्यातील कटुता मिटवून एकत्र यावे लागले. कोर्ट परिसरात हे सगळे घडत असताना परिसरातील लोकांनी मुलाच्या भविष्याचा विचार करून मतभेद विसरून जाण्याचे त्या दाम्पत्याला समजावले. त्यानंतर पतीने पत्नीची माफी मागत पुन्हा चुका न करण्याचे आश्वासन दिले.
पतीने माफी मागितल्यावर पत्नीने बराच वेळ विचार करून शेवटी हो म्हणत भांडण मिटवले. या सगळ्यानंतर पत्नीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत केस मागे घेतली. साहिबाबाद भागात राहणाऱ्या एका तरूणाचं सहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर एक वर्षाने त्यांना मुलगा झाला. त्यानंतर दोन वर्षाने त्या दोघांमध्ये वाद झाले.
वादानंतर महिला मुलाला घेऊन वेगळं राहू लागली. महिलेने उदरनिर्वाह निधीसाठी पतीविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तर दुसरीकडे, पतीने मुलाच्या हक्कासाठी कोर्टात केस दाखल केली. तेव्हापासून या प्रकरणात कोर्टात सुनावणी बाकी होती. पण गुरूवारी (ता. 7 जून) या प्रकरणाचा निकाल त्या दाम्पत्याच्या मुलानेच लावला.