‘त्या’ चौघांची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली आहेत. आरोपींची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम जाहीर करण्यात आलं आहे.
‘आपल्याला या नराधम लोकांबद्दल काही माहिती असेल तर अवश्य द्या. अत्यंत निर्घृणपणे एका निरागस, निष्पाप व्यक्तीची यांनी हत्या केली आहे’ असा मथळा लिहून मराठा युवा क्रांतीकडून रोख 50 हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे.
एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चलचित्रं जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमहनगरमधील आहेत. 10 जानेवारी दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 जानेवारीपर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 51 वर पोहोचली होती.