तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याने बुलढाण्यात ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याने बुलढाणा जिल्ह्यात सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यश संजय गवते असे या मुलाचे नाव असून मुलाच्या मृत्यूमुळे गवते कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे राहणारा सहा वर्षांचा यश गवते मंगळवारी मित्रांसोबत घरासमोर खेळत होता. खेळताना त्याला सुतळी बॉम्ब सापडला. यशने सुतळी बॉम्ब फोडण्यासाठी विस्तवासमोर ठेवला. पण बॉम्ब फुटलाच नाही. मग यशने सुतळी बॉम्ब पुन्हा हातात घेतला. यश सुतळी बॉम्बची वात तोंडात धरत असतानाच तो फुटला. यात यशच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून फटाके फोडताना निष्काळजीपणा केल्यास असा दुर्दैवी प्रसंग ओढावू शकतो. त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाके फोडताना अपघात होऊ नये, याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले जात आहे.