breaking-newsपुणे
तीन लग्न करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

पहिले लग्न झालेले असताना आणखी दोन लग्न करणा-या पोलीस कर्मचा-यावर निलंबनाची कारवाी करण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या कर्मचा-यावर ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.प्रविण मुंढे यांनी केली आहे.
विजय लक्ष्मण जाधव असे निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे.
विजय जाधव यांचा पहिला विवाह झालेला असतानाही त्यांनी पहिल्या पत्नीला कल्पना न देता 24 डिसेंबर 2016 रोजी दुसरे लग्न केले. त्यानंतर जाधव यांच्या पहिला पत्नीचा न्यायालयात खटला सुरू असल्याची माहिती त्यांच्या दुस-या पत्नीला मिळाली. त्याबद्दल तिने जाधव यांना जाब विचारला असता त्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जाधव यांच्या त्रासाला कंटाळून दुसरी पत्नीही माहेरी निघून गेली. त्यानंतर जाधव यांनी 20 डिसेंबर 2017 रोजी खेड तालुक्यातील एका तरुणीशी तिसरा विवाह केला.
ही माहिती दुस-या पत्नीला समजताच त्यांनी जाधव यांच्यासह सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, जाधव यांनी तीन लग्न केल्याचे समजल्यानंतर पोलीस उपआयुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी चौकशी केली आणि दोषी आढळलेल्या या कर्मचा-याचे निलंबन केले.