तापमान वाढीमुळे खोकला, सर्दीसह अन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढतेय

पुणे – तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून खोकला, चक्कर, डोकेदुखी, लो ब्लडप्रेशर, डिहायड्रेशन आणि पोटाच्या विकाराच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. उन्हाचा तडाखा व घशाला पडणारी कोरड टाळण्यासाठी रस्त्यावरचे ज्यूस, उघड्यावरची फळे, बर्फाचे गोळे, कुल्फी, शीतपेयांचा मारा केल्याने अनेकांना विषबाधा, हगवण, उलट्यांचा त्रास होण्याचे प्रकार वाढीस लागले असून व्हायरल ताप व सर्दीचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्णही आढळत असून उलट्या, जुलाब, श्वसनाचे विकार, अति-उन्हामुळे स्ट्रोकचे प्रमाणही वाढत आहे.
उन्हाचा कडाका वाढल्यावर त्यावर मात करण्यासाठी थंडगार सरबत, बर्फाचे गोळे, कुल्फी, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये विक्रीला ठेवलेले विविध प्रकारचे ज्यूस, स्टेशनच्या बाहेर लिंबू सरबत किंवा संत्र्याच्या सरबतावर अनेकजण ताव मारतात. या दिवसात अशा प्रकारच्या सरबतांच्या विक्रीत प्रचंड वाढ झालेली दिसून येते. पण त्यासाठी कोणते पाणी वापरतात याची आपल्याला कल्पनाही नसते. हे पाणी दूषित असल्यास पोटाच्या तक्रारी तत्काळ सुरू होतात. हल्ली अनेकदा रस्त्यावर लिंबू सरबत विक्री करणारे नामांकित कंपन्यांचे बाटलीबंद पाणी वापरत असल्याचा फलक लावतात; पण अनेकदा तेही हानिकारण असते. या सरबताचे ग्लास धुण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते याची आपल्याला माहितीही नसते. दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असून गेल्या आठवड्यात ३ ते ४ संशयित रुग्ण आढळ्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर डायरियासारख्या आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून दिवसाला ५ ते ६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. उन्हाळी आजारांनी डोके वर काढले असून उन्हाळ्यात बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.
दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे. अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जास्तीत-जास्त प्यावे, ज्यांना हृदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे. आहारामध्येही रसदार फळांचा वापर करावा. तसेच मांसाहार, मद्यपान करू नये, असेही डाॅक्टरांनी सांगितले.