… तर भारतात परतण्यास तयार: झाकीर नाईक

वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याने भारतात परतण्यासाठी तयारी दर्शवली आहे. परंतु यासाठी त्याने एक अटही घातली आहे. आपण दोषी ठरत नाही तोवर आपल्याला अटक केली जाणार नसल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास आपण भारतात परतण्यास तयार असल्याचे झाकीर नाईकने सांगितले.
दरम्यान, मला आजही भारतीय न्यायिक व्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु यापूर्वी न्यायिक व्यवस्था आधिक चांगली असल्याची तो ‘द विक’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाला. तसेच भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सरकार विरोधात बोलू शकत होतो आणि न्याय मिळण्याचीही शक्यता 80 टक्क्यांपर्यंत होती. परंतु आज ती न्याय मिळण्याची शक्यता 10 ते 20 टक्के असल्याचे त्याने सांगितले.
इतिहासात पाहिले तर दहशतवादाच्या आरोपांचा सामना करणाऱ्या 90 टक्के लोकांना जास्तीत जास्त 10 ते 15 वर्षात त्यातून मुक्त करण्यात आले. परंतु मी भारतात परतल्यास कमीतकमी 10 वर्ष तरी मला तुरूंगात टाकण्यात येईल आणि त्यामुळे माझे कामही बाधीत होईल. अशा परिस्थितीत मी पुन्हा येण्याची चुक का करू ? असा सवालही त्याने यावेळी केला. दरम्यान, आपण जोवर दोषी ठरणार नाही तोवर आपल्याला अटक करण्यात येणार नाही, याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाले तरच आपण भारतात येऊ, असे झाकीर नाईकने स्पष्ट केले.
1 जुलै 2016 रोजी ढाक्यात एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचे नाव समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर आरोपही लावले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या त्या हल्ल्यात तब्बल 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.