Mahaenews

तब्बल सव्वाकोटींचा ऐनवेळचा विषय कसा मंजूर केला: मारुती भापकर

Share On

पिंपरी: ऐनवेळचा विषय स्थायी समितीत स्वीकारणार नसल्याची घोषणा करणा-या भाजपने पंतप्रधान आवास योजनेसाठी सल्लागार नेमण्याचा ऐनवेळचा तब्बल सव्वा कोटीचा विषय कसा मंजूर केला, असा सवाल माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे.

मारुती भापकर यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपण पहिल्याच सभेत ऐनवेळचे विषय स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या दुस-याच सभेत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ऐनवेळी स्थायी समिती समोर सादर केला. त्याच्या सव्वाकोटीच्या विषयाला तातडीने मंजुरी देण्यात आली. हा विषय चांगला आहे. या विषयाला आमचा विरोध नाही.

परंतु, हा विषय रीतसर स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर आणता आला असता. मात्र, तसे न करता आपण ऐनवेळी विषय आणून आपल्याच भूमिकेवरून फारकत घेतली आहे. आपण आपली भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्न भापकर यांनी उपस्थित केला आहे.  तसेच भय, भष्ट्राचारमुक्त पालिका व पारदर्शक कारभार या आपल्या घोषणाचा एवढ्या लवकर विसर कसा पडला, असेही त्यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीवेळी भय, भ्रष्टाचारमुक्त पालिका व पारदर्शक कारभार या घोषवाक्यावर भाजपने सत्ता मिळविली. जनतेने भाजपवर विश्वास ठेवून पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. महापालिकेच्या स्तरावर  होणा-या निर्णयामध्ये वाढीव खर्चाच्या उपसूचना, ऐनवेळचे विषय व वर्गीकरण हे घेणार नाही. अधिकारी, ठेकेदार व सल्लागार यांची साखळी तोडणार अशा स्वरुपाच्या घोषणा केल्याची, आठवणही भापकर यांनी भाजपच्या पदाधिका-यांना करून दिली आहे.

दरम्यान, सीमा सावळे यांनी भापकर यांना धोरणात्मक प्रस्ताव आणि सदस्यांनी मांडलेले ऐनवेळचे प्रस्ताव याच्यातील फरक कळत नाही, असे प्रत्युत्तर दिले.

Exit mobile version