‘ढोंग बंद करा…’ भाजप विरोधात सोशल मीडियावर ‘हल्लाबोल’

‘सरसकट शास्तीकर माफी’साठी मुख्यमंत्री, भाजप आमदार व पालिका पदाधिकारी ‘टार्गेट’
पिंपरी (विकास शिंदे) – लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूकीत अनधिकृत बांधकामाच्या शास्तीकरांचा मुद्दा कळीचा ठरला होता. याप्रसंगी भाजपच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सत्ता द्या, शास्तीकरातून पुर्णपणे सुटका करु, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडकराना दिले होते. परंतू, त्यांनी सरसकट शास्तीकर माफ न करता, केवळ 600 चौरस फुटापर्यंतच्या बांधकामाना शास्तीकरातून शंभर टक्के माफी दिली. तसेच संपुर्ण शास्तीकराची माफी देण्याच्या आश्वासनावरुन यु टर्न घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘ढोंग बंद करा’ आणि ‘जनतेला वेढ्यात काढायचेही बंद करा’, अशा पध्दतीने सोशल मीडियातून ‘फेक पोस्ट व्हायरल’ झाल्याने ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 4 लाख 50 हजार 761 मालमत्ता आहेत. त्यापैकी निवासी अनधिकृत 70 हजार 718 तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक 9 हजार 58 अवैध बांधकामे अशा एकूण 79 हजार 774 अनधिकृत बांधकामे आहेत.पालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनधिकृत बांधकामांना चाप बसावी, याकरिता तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने शास्ती कर लागू केला. त्या बांधकामांना सन 2012-13 पासून शास्तीकर लावला आहे. या शास्तीकराने सर्वसामान्य नागरिकांना मिळकतकरासह शास्तीकर हा जिझया कर वाटू लागला. आतापर्यंत सुमारे 576 कोटी रुपये शास्तीकर आहे. त्यापैकी सुमारे 150 कोटी रुपये शास्तीकर वसूल झाला आहे. तर तब्बल सुमारे 426 कोटी रुपये शास्तीकर वसुल झालेला नाही. मिळकतधारक शास्तीकर भरत नसल्याने थकबाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
राज्य शासनाने 600 चौरस फुटापर्यंतच्या 33 हजार 304 निवासी बांधकामांना शास्ती कर माफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, 601 ते 1000 चौरस फुटापर्यंतच्या 19 हजार 485 निवासी बांधकामांना 50 टक्के तर 1001 चौरस फुटावरील 17 हजार 929 निवासी बांधकामांना चालु वर्षीच्या मालमत्ताकराच्या दुप्पट दराने शास्तीकर भरावा लागणार आहे. याबाबत शासनाने यापुर्वीच अध्यादेश काढला होता. परंतू, त्याला राज्य मंत्रिमंडळाने 29 मे रोजी मान्यता देत पुर्वलक्षी प्रभावाने शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने मोजक्याच लोकांना शास्तीकराचा लाभ होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफीचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. परंतू, या निर्णयाचा मोजक्याच लोकांना फायदा होणार असल्याने विरोधकांनी शास्तीकर माफी ही सरसकट करावी, या मागणीसाठी फेक पोस्ट व्हायरल केली आहे. या पोस्टमधून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सहयोगी आमदार महेश लांडगे व महापालिका पदाधिका-यांना टार्गेट करण्यात आले आहे. तसेच हे ढोंग बंद करा, जनतेला वेढ्यात काढू नका, अशा पध्दतीने मजकूर छापून सोशल मीडियातून सर्वत्र पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.