ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा- भाजप आमदार

जोधपूर: अंमली पदार्थांची तस्करी करु नका. त्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याची तस्करी करताना अटक झाल्यास जामीन मिळतो, असं धक्कादायक विधान भाजपचे आमदार अर्जुन लाल गर्ग यांनी केलं आहे. अंमली पदार्थांची तस्करी हा अजामीनपत्र गुन्हा आहे. पण सोन्याची तस्करी करताना अटक झाल्यास अतिशय सहज जामीन मिळतो. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी न करता सोन्याची तस्करी करा, असं गर्ग यांनी म्हटलं.
देवासी समुदायाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना गर्ग यांनी बेताल वक्तव्य केलं. गर्ग यांच्या विधानाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. देवासी समुदायाला संबोधित करताना गर्ग यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा संदर्भ दिला. ‘अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत कितीजण जोधपूरच्या तुरुंगात आहेत, असा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केला होता.
त्यावेळी बिष्णोई समाजापेक्षा देवासी समुदायचे जास्त लोक तुरुंगात असल्याचं मला समजलं,’ असं गर्ग म्हणाले. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे होणारी शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी एक धक्कादायक सल्ला यावेळी दिला. ‘अंमली पदार्थांची तस्करी करुन तुरुंगात जाण्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याच्या तस्करीत लवकर जामीन मिळतो,’ असं गर्ग यांनी म्हटलं.