डोग्रा समाजासाठी भाजप नेत्याची बिगर राजकीय संघटना

जम्मू – डोग्रा समाजाला मिळणाऱ्या भेदभावाविरोधात लढण्यासाठी भाजपचे नेते चौधरी लाल सिंग यांनी एक बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. “डोग्रा स्वाभीमान संघटना’ असे या संघटनेचे नाव आहे.
जम्मू काश्मीरमधील बशोली विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या चौधरी लाल सिंग यांनी आज आपल्या या संघटनेची उद्दिष्टे आणि ध्वज प्रसिद्ध केले. कथुआ सामुहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण होत असतानाच त्यांनी ही संघटना स्थापन केली.
कथुआ प्रकरणी दोषींना अटक व्हावी या मागणीसाठी निघालेल्या मोर्चामध्ये चौधरी लाल सिंग आणि अन्य आमदार चंदर प्रकाश गंगा सहभागी झाले होते. त्यानंतर या दोघांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. डोग्रा समाजाला पोलिसांचा जाच सहन करावा लागत असल्याचा आरोप जम्मू बार असोसिएशनने केला होता.