डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान

१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते.
डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास पूर्ण केला व पदवी संपादन केली. म्हणजे एम.ए. , पीएच.डी., एलएल.डी., डॉ. डिलिट, बार ॲट लॉ इत्यादी पदव्यांनी उच्चविद्या विभूषित बाबासाहेब आंबेडकर झाले.
बाबासाहेबांनी जगातील सामाजिक शास्त्रांचा (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहासशास्त्र आणि कायदा शास्त्र) सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर जगातील साम्राज्यशाही, भांडवलशाही, जगातील युद्ध, स्वाऱ्या, लढाया आणि विविध क्रांत्यांचा अभ्यास केला. तसेच वंशवादाचा आणि जागतिक स्तरावर असलेल्या गुलामांच्या जीवनांचा अभ्यास केला.
डॉ. बाबासाहेबांच्या वाचनात, चिंतनात व लेखनात प्रचंड ताकद, शक्ती होती. ज्ञानसंपन्नतेच्या शक्तीमुळेच व्यक्ती, समाज, राज्य आणि राष्ट्र महान बनत असते, याची त्यांना पुरेपूर जाणीव झाली होती. त्यामुळे १८-१८ तास अभ्यास करून शेकडो वर्षांचा शिल्लक राहिलेला ज्ञानाचा बॅकलॉग बाबासाहेब भरून काढत होते.
डॉ. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताच्या नव्या उभारणीचे एक महान वैभव बनले होते.
लोकशाही आणि राज्यघटना ः जगातील आदर्श समाज निर्माण
करण्यासाठी त्यांनी लोकशाही शासनाचा स्वीकार केला. त्यासाठी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणि त्यांची एकच किंमत हा सिद्धांत दिला. ही राजकीय लोकशाही असली तरीही त्याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये व्हावे, असे त्यांना वाटत होते. तरच जगापुढे हा देश टिकेल अन्यथा अडचणीत येईल. यासाठी त्यांनी जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुधारणा व सर्वांगीण विकास करता येईल, अशी राष्ट्राला राज्यघटना दिली.
२१ व्या शतकात देशाला विकासाच्या दिशेने जावयाचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असे मला वाटते.
आंबेडकरांचे लिखाण
वृत्तपत्रे – मूकनायक १९२०, बहिष्कृत भारत १९२७, जनता १९३०, प्रबुद्ध भारत १९५६.
ग्रंथ – शुद्र पूर्वी कोण होते
दि अन्टचेबल्स (अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर सिद्धांत लिहिले)
प्रॉब्लेम ऑफ दि रुपी
पार्टिशन ऑफ इंडिया
हिंदू कोड बिल
भारताचे संविधान
द बुद्धा अँड हिज धम्मा.
अशी ५८ पुस्तके व ग्रंथ.