Mahaenews

डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत समानता अद्याप बाकी – चंद्रकांत दैठणकर

Share On

पिंपरी-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटीत व्हा’ या विचारांच्या आचरणानेच समाजातील उपेक्षित घटकाला सन्मानपूर्वक जीवन जगता येईल. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असणारे समानतेचे ध्येय अद्याप बाकी आहे. त्यासाठी आणखी संघर्ष करणे आवश्यक आहे. तरच समाजातील विषमता कमी होऊन समतेचे राज्य स्थापित होईल, असे मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत दैठणकर यांनी सांगवी येथे केले.

जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव, औंध कॅम्प, बोपोडी, दापोडी परिसरातील 42 बौद्ध विहार, विविध सामाजिक, धार्मिक, संस्था, संघ, बचतगटांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे 387वी, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले 190 वी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 21) पोलीस महानिरीक्षक दैठणकर यांच्या हस्ते संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्‌घाटन कांबळे मैदान, पीडब्ल्यूडी ग्राऊंड सांगवी, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार आण्णा बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त दीपक हुंबरे, संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, ॲड. राजेश नितनवरे आदी उपस्थित होते.

इतिहास लेखक कोकाटे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तरेच्या नद्या दक्षिणेकडे वळवून पठारावरील जमीनीला पाणी द्यावे, खोती पद्धत बंद करावी यासाठी काम केले. पृथ्वी गोल आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. दिशा काल्पनीक आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आले. सर्व दिशा, सर्व दिवस शुभच असतात, वास्तुशास्त्र, राशीभविष्य हे थोतांड आहे. घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावे या पेक्षा घरात राहणा-या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत सामर्थ्य हवे. याच्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. उपवास, व्रत वैकल्य करण्यापेक्षा भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जिथे जे उपलब्ध असेल ते खावे. गौतम बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी होते. व्यक्ती कोणत्या विचारांची, संस्कृतीची आहे यावर त्यांचे कर्तृत्व ठरते. स्वर्ग, नर्क, पुर्नजन्म या कल्पना गरीबांच्या शोषणासाठी तात्कालिन समाज व्यवस्थेत निर्माण झाल्या.

तिर्थस्थळी जाऊन मुक्ती मिळत नाही ‘आई-वडील तुझपाशी, कशाला करतो काशी’, हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. प्राथमिक, माध्यमिक उच्च शिक्षण आता भांडवलशाहीच्या हातात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे झाले तर ग्रामीण भागातील शेतक-यांच्या, भटक्या विमुक्तांच्या, दलितांच्या, अल्पसंख्यांकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल. बुवा, बापू, महाराजांच्या विचारांचे लोक क्रांती करू शकत नाहीत. तर गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईकच प्रबोधनाच्या माध्यमातून समाजक्रांती घडवू शकतात. जगाला जसा ईसीस आणि तालिबान्यांपासून धोका आहे तसाच या देशाला आरएसएस आणि त्यांच्या विचारांमुळे धोका आहे. जगाला दहशतवादापासून मुक्ती हवी असल्यास तथागत गौतम बुद्धांचे विचारच वाचवू शकतात. विद्वत्तेचा, ज्ञानाचा सन्मान म्हणूनच डॉ. आंबेडकरांचे जगभर पुतळे उभारण्यात आले आहेत, असेही कोकाटे यांनी सांगितले.

राहुल काकडे यांनी स्वागत केले. महादेव रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. अमरसिंग आदियाल यांनी आभार मानले.

Exit mobile version