डाॅ. अमोल कोल्हे कुटुंबीयांकडे सव्वाचार कोटींची मालमत्ता

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे 3 कोटी 10 लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 23 लाख 50 हजार रुपयांची मालमत्ता आहे, अशी माहिती कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात दिली आहे.
डॉ. कोल्हे यांच्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये नारायणगाव (कोल्हे मळा) ता. जुन्नर वडिलोपार्जित 6 एकर 33 गुंठे जमीन आहे. त्याची किंमत 66 लाख 53 हजार रुपये इतकी आहे; तसेच कोल्हे मळा येथे 336 चौरस फूट आणि 996 चौरस फुटांचे घर वडिलोपार्जित आहे, तर परेल येथे 662 चौरस फुटांची सदनिका आहे. त्याची किंमत 85 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. त्याचबरोबर कोल्हे आणि त्यांच्या पत्नीवर 7 लाख 44 हजार रुपयांचे गृहकर्ज आहे.
डॉ. कोल्हे यांच्याकडे रोख रक्कम 1 लाख 90 हजार रुपये, तर पत्नीकडे 1 लाख 5 हजार रुपये इतकी रोख रक्कम आहे. कोल्हे यांच्याकडे 44 लाख 8 हजार रुपयांच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये आहे, तर पत्नीकडे 8 लाख 90 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत.
बॉण्ड, शेअर्स आणि म्युच्युअल फंडामध्ये 4 लाख 26 हजार रुपयांची गुंतवणूक कोल्हे यांनी केली आहे, तर पोस्ट खात्याच्या योजना, एलआयसी आदी विमा कंपन्यांमध्ये 22 लाख 20 हजार रुपयांची गुंतवणूक कोल्हे यांनी केली आहे, तर पत्नीच्या नावेही 20 लाख रुपयांची गुंतवणूक पोस्ट खाती, एलआयसी यामध्ये आहे. कोल्हे यांच्याकडे 24 लाख रुपये किमतीचे वाहन असून, पत्नीकडे 18 हजार किमतीची दुचाकी आहे.
कोल्हे यांच्याकडे 2 लाख 46 हजार किमतीचे सोने, तर पत्नीकडे 7 लाख 96 हजार किमतीचे सोने-चांदी आहे. कोल्हे यांनी 52 लाख 15 हजार रुपये कंपनीला दिले आहेत.