ठार मारण्याचा प्रयत्न; दोघांना पोलीस कोठडी

पुणे – पुर्ववैमनस्यातून एकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीसांनी दोघांना अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सराफ दोघांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
विकास दिलीप मांढरे (वय 30, रा. लोहियानगर), साहिल नासिर सय्यद (वय 19, रा. पीएमसी कॉलनी, महात्मा गांधी विद्यालयाजवळ) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजिंक्य शिंदे, दत्ता चव्हाण, प्रसाद शिंदे, केदार शिंदे, मंदार खंडागळे, केदार खंडागळे, बाबा कसबे, अमित ऊर्फ अंबई वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास गोविंद कांबळे (वय 18, रा. लोहियानगर) यांनी फिर्याद दिली आहे. 27 मे रोजी ही घटना घडली होती.
फिर्यादी यांचे मित्र करण पवार, यश लोंढे, राहुल खवळे आणि आरोपी अजिंक्य शिंदे यांच्यामध्ये जूना वाद होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी त्यांचे मित्र करण पवार, यश ऊर्फ आदित्य लोंढे, अभिजित ऊर्फ नरेश कांबळे, राहुल खवले यांच्यासह सारसबाग येथे पावभाजी सेंटरवर पावभाजी खात होते. त्यावेळी वरील सर्व आरोपी लोखंडी रॉड, कोयता, तलवारी, गज घेवून त्या ठिकाणी आले. केदार शिंदे हा मोठ्याने ओरडला असता, फिर्यादी यांचे चार मित्र त्या ठिकाणाहून पळून गेले. फिर्यादी हे पळून जात असताना केदार शिंदे याने त्यांच्या डोक्यात पालघन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मांढरे, सय्यद यांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यासाठी, फरार इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनाविली.