ट्रेडमार्क नोंदणीमध्ये तिपटीने वाढ…

- पंतप्रधान नरेंद्र मोदी : 45 टक्के स्टार्ट अपची स्थापना महिलांकडून
नवी दिल्ली – ट्रेडमार्कसाठी पूर्वी 74 अर्ज भरावे लागत होते. आता ही संख्या 8 पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षात ट्रेडमार्क नोंदणीमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत पेटंट नोंदणीच्या संख्येतही तिप्पट वाढ झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट अपचा अर्थ डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यता, असे मानले जात असे. मात्र, आता काळ बदलला आहे. विविध क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योजक आता नावारुपाला येत आहेत. 28 राज्ये, 6 केंद्र शासित प्रदेश आणि 419 जिल्ह्यांमध्ये स्टार्ट अपची व्याप्ती पसरली आहे.
स्टार्ट अप इंडिया अंतर्गत संबंधित क्षेत्रातील स्थानिकांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्यामुळे 44 टक्के स्टार्ट अप हे Tier-2 आणि Tier-3 शहरांमध्ये नोंदविण्यात आले आहे. मुख्य म्हणजे 45 टक्के स्टार्ट अपची स्थापना महिलांनी केली आहे.
युवा उद्योजकांना स्टार्ट अपसाठी निधीची कमतरता भासू नये आणि नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या युवांना सुविधा उपलब्ध करुन देता याव्यात, यासाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या निधीची निर्मिती केली आहे. या निधीच्या माध्यमातून 1285 कोटी रुपयांच्या वित्त पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले असून, 6980 कोटी रुपयांचा पत पुरवठा करण्यात आला आहे.
नाविन्याला चालना देण्यासाठी आणि युवा वर्गात स्पर्धात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने अटल न्यू इंडिया चॅलेंज, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि ऍग्रीकल्चर ग्रॅंड चॅलेंज अशा विविध स्पर्धा सुरु केल्या आहेत. सिंगापूर आणि भारतामधील नवोन्मेषींमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सारखी स्पर्धा घेण्यासंदर्भात सिंगापूरच्या पंतप्रधानांशी आपण चर्चा केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
नवउद्योजकांना संबोधित करतांना कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवा वर्गांनी आपल्या संकल्पना घेऊन समोर यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. मेक इन इंडियाच्या बरोबरीने “डिझाइन इन इंडिया’ सुद्धा आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.