‘ट्रिपल’ तलाकमुळे मुस्लिम महिला त्रस्त- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भुवनेश्व- ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिलांना त्रास सहन करावा लागतोय. आपण त्यावर उपाय शोधले पाहिजेत, यासाठी जिल्हास्तरावर काम करण्याची गरज असल्याचंही मतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना ते ओडिशामध्ये बोलत होते. मोदींनी स्वपक्षीय नेत्यांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देताना विरोध पक्षांवरही हल्लाबोल केला आहे. तसेच ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि भाजपा मुस्लिम महिलांसोबत असल्याचं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. तर दुसरीकडे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं ट्रिपल तलाकमध्ये कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच विनाकारण ट्रिपल तलाक देणा-या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असंही बोर्डानं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशात असहिष्णुता वाढल्याचं कारण देत पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिक आता कुठे आहेत. विरोधक प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एक नवा मुद्दा उखरून काढत असतो. बिहार निवडणुकांच्या आधी पुरस्कार परत करण्यात आले होते. सध्या पुरस्कार परत करणारे कुठे आहेत ?, त्यानंतर दिल्लीत चर्चवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा मुद्दा उचलला जातोय. मला वाटतं विरोधकांकडे नवे मुद्दे जन्माला घालण्याचा कारखाना आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिकांसोबतच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये मिळालेला विजय हा ऐतिहासिक असल्याचं म्हणत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.