ट्रम्प यांनी चर्चा रद्द केल्यानंतर उत्तर कोरियाला जाग

- आता म्हणतात कोणत्याही वेळी चर्चेला तयार
सेऊल – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्याशी येत्या 12 जूनला सिंगापुरला होणारी चर्चा अचानक रद्द करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर उत्तर कोरियाला जाग आली असून त्यांनी आता आमची अमेरिकेशी कोणत्याही दिवशी चर्चा करण्याची तयारी आहे असे म्हटले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर आमच्याशी उघडपणे शत्रुत्व घेतल्याने आपण ही चर्चाच रद्द करीत आहोत असे म्हटले आहे. उत्तर कोरियाने ही चर्चा ठरलेली असतानाही मुर्खपणाची व बेमुर्वतखोर कृती करून आम्हाला डिवचले आहे असेही अमेरिकेने म्हटले आहे. या संबंधात स्वता ट्रम्प यांनी किम यांना पत्र पाठवले असून त्यात त्यांनी आम्ही आता 12 जूनच्या चर्चेला तयार नसल्याचे त्यांना कळवले आहे. उत्तर कोरियाने आमच्याशी चर्चेची आधी तयारी दर्शवून नंतर आपले आश्वासन पाळले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी चर्चा रद्द केल्याच्या घोषणा करण्यापुर्वी काही काळ आधी उत्तर कोरियाने आपण आपला अण्वस्त्र निर्मीतीचा प्रकल्प पुर्ण बंद करून तो विघटीत केल्याचे म्हटले होते. उत्तर कोरियाने आधी दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्यात होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायतीचे कारण देत त्याचा या चर्चेवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांचे विधान मुखपर्णाचे आहे अशी मुक्ताफळे उधळून अमेरिकेला आणखी डिवचले होते. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाशी आत्ताच चर्चा करण्यात अर्थ नाही ही चर्चा नंतर कधीतरी होऊ शकेल असेही ट्रम्प यांनी किम जोंग यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.