ट्रम्प-किम शिखर परिषद तहकूब होण्याची शक्यता……..

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूरमध्ये होणारी शिखर परिषद तहकूब होण्याचे संकेत मिळत आहेत. अद्याप अधिकृत रीतीने काही जाहीर करण्यात आले नसले, तरी मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प-किम जोंग उन यांच्यातील शिखर परिषदेच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन डोनॉल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला पोहचले आहेत. त्यांच्यात ट्रम्प-किम यांच्या भेटीसंबंधी चर्चा झाल्याचे समजते. 12 जूनच्या शिखर परिषदेतून अंग काढून घेण्याच्या उत्तर कोरियाच्या इशाऱ्याने शिखर परिषदेचे भवितव्य लटकले आहे.
अमेरिकेच्या एकतर्फी दबावामुळे आपण शिखर परिषदेवर बहिष्कार घालू असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. मात्र उत्तर कोरियाने तसे केले तर त्याचे परिणाम फार गंभीर होतील असे सांगत असतानाच अमेरिकेने उत्तर कोरियाच्या किम जोंग ऊन यांना संपूर्ण संरक्षण देण्याचा विश्वास दिला आहे.