ट्रम्प – किम जोंग यांच्या भेटीच्या आशा पुन्हा पल्लवीत

- अमेरिकेचे शिष्टमंडळ उत्तर कोरियात दाखल
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यातील 12 जुनला ठरलेली चर्चा ठरल्याप्रमाणेच होण्याची शक्यता आहे. या चर्चेचा तपशील ठरवण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या उत्तर कोरियात गेले आहे अशी माहिती स्वत: अध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. या आधी अध्यक्ष ट्रम्प यांनीच ही चर्चा होणे शक्य नाही. ती नंतर कधीतरी होईल असे म्हटले होते. पण सध्याच्या दोन्ही देशांतील हालचाली पहाता ही चर्चा ठरल्याप्रमाणेच 12 जुनला सिंगापुरला होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आम्ही अमेरिकेशी कोणत्याही दिवशी कोठेही चर्चेला तयार आहोत असा संदेश उत्तर कोरियाच्या अध्यक्षांकडून देण्यात आल्यानंतर पुन्हा या थंडावलेल्या चर्चेची चक्रे फिरली. आपल्या आणि किम जोंग यांच्यातील चर्चेचा तपशील ठरवण्याचे काम सध्या अमेरिकेचे शिष्टमंडळ उत्तर कोरियात करीत आहे अशी माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनीच आज आपल्या ट्विटर अकौंटवर दिली. याच संदेशात अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की उत्तर कोरियात आर्थिक विकासाची मोठी क्षमता आहे. हा देश एकेदिवशी मोठी आर्थिक शक्ती होईल.
माझ्या या मताशी किम जोंग हेही सहमत आहेत आणि हे एके दिवशी नक्की होईल. ट्रम्प यांच्या या विधायक विधानाने चर्चेची खंडीत झालेली शक्यता पुन्हा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक शांततेच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. हे देश मध्यंतरी इतके हमरी-तुमरीवर आले होते की त्यांच्यात अणु युद्ध होतेय की काय अशी शंका निर्माण झाली होती त्यामुळे या चर्चेला महत्व आहे.