ट्युनिशिया जवळ बोट बुडाल्याने 35 शरणार्थींचा मृत्यू

ट्युनिस – ट्युनिशियाच्या दक्षिणेकडील स्फॅक्स प्रांताच्या किनाऱ्याजवळ शरणार्थींची बोट बुडून सुमारे 35 शरणार्थींचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतरच्या बचाव कार्यादरम्यान सुमारे 35 जणांचे मृतदेह मिळाले आहेत, तर 68 जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. हे शरणार्थी असलेली बोट किनाऱ्यापासून 30 किलोमीटर दूर अंतरावर असताना बुडायला लागल्यावर सैन्याला मदतीचा इशारा पाठवण्यात आला होता.
मात्र मदतीची बोट पोहोचेपर्यंत शरणार्थींची बोट समुद्रामध्ये बुडाली होती. मासेमारीच्या बोटींमधून काही शरणार्थींना वाचवण्यात आले. वाचलेल्या शरणार्थींमध्ये ट्युनिशिया आणि काही विदेशी शरणार्थींचा समावेश आहे. हे सर्व जण बेरोजगारीमुळे निराश झाल्याने स्थलांतर करत होते, असे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.
या दुर्घटनेमध्ये 11 जणांचे मृतदेह मिळाल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली होती. मात्र नंतर बचाव कार्याच्या सूत्रांच्या आधारे 35 जणांचे मृतदेह मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात शरणार्थींची बोट आणि ट्युनिशियाच्या लष्कराचे जहाज यांची टक्कर झाली होती. त्या अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला होता. ट्युनिशियाचे पंतप्रधान युसुफ चाहेद यांनी ही दुर्घटना म्हणजे राष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हटले होते.