टोईंगवाल्यांची “टगेगिरी’
पावती’ न फाडणाऱ्या चालकाला दुचाकीसह टेम्पोत ढकलले
विमाननगर येथे पोलिसांसमोरील प्रकार : व्हिडिओ सोशल मीडियावर
पुणे- “नो पार्किंग’मधील दुचाकी टोईंगवाल्यांनी ओढल्याची घटना विमाननगर येथे बुधवारी घडली. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे याची जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी संबंधित चालकाची “नो पार्किंग’मध्ये दुचाकी लावल्याबद्दल दंडाची पावती करण्यात आली आहे. दरम्यान, ही “टगेगिरी’ थेट वाहतूक पोलिसांसमोरच सुरू होती.
बुधवारी विमाननगर येथील श्रीकृष्ण हॉटेल चौकात “नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई सुरू होती. या ठिकाणी येरवडा वाहतूक शाखेचे सहायक फौजदार जे. ए. शेख हे खासगी कर्मचाऱ्यांसह टेम्पो घेऊन “नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करत होते. दरम्यान, एक युवक अचानक दुचाकीवर बसला. त्या दुचाकीवर “नो पार्किंग’मध्ये लावल्याबद्दल कारवाई करायची होती.तेथे संबंधित युवक व वाहतूक पोलीस व टोईंगवाल्यांत वाद झाला. युवक त्या दुचाकीवर असतानाही त्याच्यासह दुचाकीही टेम्पोमध्ये या टोईंगवाल्यांनी नेली.
त्यानंतर येरवडा वाहतूक पोलिसांनी “नो पार्किंग’च्या दंडाची पावतीची नोंद केली होती. मात्र, त्याची रक्कम या युवकाने अजून दिलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक मिसाळ यांनी दिली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे याची चर्चा शहरात होती. संबंधित प्रकरणी सहायक फौजदार शेख यांनी केलेली कारवाई तसेच या युवकाची देखील सगळी माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पुढील योग्य ती कारवाई करू, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मिसाळ यांनी दिली.