breaking-newsमहाराष्ट्र

‘टी १’ वाघिणीचे बछडेही मृत्यूच्या वाटेवर?

  • तब्बल सहा-सात दिवसांपासून उपाशीच

पांढरकवडय़ातील  ‘टी १’ वाघिणीला गोळया घालून ठार करण्यात आले. आता तिच्या निरपराध बछडय़ांची हेळसांड सुरू झाली आहे. तब्बल सहा-सात दिवसांपासून उपाशी असल्याने तेदेखील वाघिणीच्या पाठोपाठ मृत्यू पावतील की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश निघाले तेव्हा तिच्या बछडय़ांचाही प्रश्न होता. यावेळी उपवनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षक यांनी दिलेल्या आदेशात प्रचंड विरोधाभास होता. एका आदेशात आधी वाघिणीला पकडून मग बछडय़ांना पकडायचे असे नमुद होते तर दुसऱ्या आदेशात आधी बछडय़ांना पकडून मग वाघिणीला पकडायचे असे नमुद होते. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनीही आधी बछडय़ांना जेरबंद करा आणि नंतर वाघिणीला पकडा असे स्पष्टपणे नमुद केले होते. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनखात्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडेही डोळेझाक केली. ही मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सर्व लक्ष त्या वाघिणीवर केंद्रीत करण्यात आले होते. त्या वाघिणीला नऊ-दहा महिन्यांचे बछडे आहेत हे देखील वनखाते विसरुन गेले. वाघिणीचे बछडय़ांना शिकार करण्यास शिकण्यासाठी किमान दोन महिन्यांचा तरी कालावधी लागतो. तोपर्यंत वाघिणीने केलेल्या शिकारीवर आणि तिच्या दुधावर त्यांचेही पोट भरत असते. या वाघिणीने २९ ऑक्टोबरला अखेरची शिकार केली होती. तेव्हापासून तिने एकही शिकार केलेली नाही. त्यामुळे तिचे बछडे देखील तेव्हापासूनच उपाशी आहेत. त्यांना खाऊ घातले जाईल असा दावा वनखाते करत असतील तरी त्याची तिळमात्रही शक्यता नाही. कारण खाऊ घालण्यासाठी आधी ते दिसायला हवेत आणि दिसले तरी त्यांना जेरबंद करता यायला हवे. आणखी दोन-चार दिवसात त्यांना खायला मिळाले नाही आणि बछडे निदर्शनास आले नाही तर मात्र, उपाशी राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत.

आनंदाचे फटाके उडवतानाच पुन्हा वाघ दिसला !

पांढरकवडा वनविभागांतर्गत १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी १ वाघिणीला ठार केल्याचा आनंद  गावकरी फटाके फोडून साजरा करीत असताना जंगलात पुन्हा वाघ दिसल्याने गावकऱ्यांची भय इथले संपत नाही.. अशी अवस्था झाली आहे. राळेगाव जंगलातील बोराटी या दुर्गम भागात नुकतेच टी १ वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले. याच परिसरात शनिवारी दुपारी घनदाट झुडपामधून रस्ता पार करत असलेला एक वाघ काही ग्रामस्थांना दिसला. उल्लेखनीय म्हणजे, वाघिणीला ठार केल्याच्या घटनेनंतर या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेला बेस कॅंम्प रातोरात रिकामा करण्यात आला.

बिबटय़ाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये लाकडे वेचण्यासाठी गेलेल्या तुळसाबाई किसनराव केदार (६०) या महिलेवर बिबटय़ाने हल्ला केला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी उशिराची असून आज रविवारी उघडकीस आली. आई घरी आली नाही म्हणून मुलगा तसेच कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तेव्हा आज सकाळी जंगलामध्ये मृतदेह मिळाला. प्रथमदर्शनी बिबटय़ाच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक प्रदीप यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button