टाईम मॅगझीनने व्हीलन नंबर १ चा खरा चेहरा समोर आणला-धनंजय मुंडे

टाईम मॅगझीनने व्हीलन नंबर १ चा खरा चेहरा समोर आणला अशी टीका करत धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्त्वाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे देशात ध्रुवीकरण सुरू आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. भारताला महासत्ता बनवणाऱ्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवलं अशीही टीका त्यांनी केली आहे.
अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक लेख लिहिण्यात आला आहे. या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख दुफळी निर्माण करणारा नेता असा करण्यात आला आहे त्याचवरून धनंजय मुंडे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
काय म्हटले आहेत लेखात?
‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’ या वाक्याने लेखाची सुरुवात झाली आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन पाच वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. मात्र त्याच वेळी यामुळे देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही,’ असंही तासीर यांनी या लेखात म्हटले आहे.