breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

टँकरग्रस्त महाराष्ट्र!

चार हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा; धरणांमध्ये अवघा २६.०१ टक्के साठा

उन्हाळ्याच्या वाढत्या काहिलीबरोबरच राज्यातील धरणांमधील पाणी झपाटय़ाने कमी होत असून धरणांमध्ये अवघा २६.०१ टक्के पाणीसाठा उरला आहे. मागील वर्षीपेक्षा तो ११ टक्क्यांनी कमी असल्याने आणखी दोन-अडीच महिने कसे जाणार याबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पाणीटंचाईमुळे राज्यातील ३१११ गावे आणि ७१५९ पाडय़ांना ३९७० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यंदा पाऊस कमी पडल्याने राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरिपाचे नुकसान झाले व रब्बीलाही फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने उन्हाळा सुरू होण्याआधीच दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करत केंद्र सरकारकडे मदत मागितली.

दोन महिन्यांपूर्वी ती जाहीरही झाली. मात्र पाण्याचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक गावांना आणि पाडय़ांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतही सरासरी २५ टक्के पाणीसाठा उरला आहे.

राज्यातील मोठय़ा धरणांमध्ये २५.६ टक्के पाणीसाठा आहे. तो मागच्या वर्षी १४ टक्के जास्त होता. तर मोठे, मध्यम, लहान असे प्रकल्प मिळून राज्यातील धरणांत केवळ २६.०१ टक्के पाणीसाठा उरला आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३७.७ टक्के होते. मराठवाडय़ात तर अवघा पाच टक्के पाणीसाठा उरला आहे.

धरणांतील पाणी आटल्याने गावोगावी पाणीटंचाईचा तडाखा बसत आहे. राज्यातील ३१११ गावे आणि ७१५९ पाडय़ांना ३९७० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात १९६ सरकारी तर ३७७४ खासगी टॅंकर आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ६०१ गावे आणि १५८ पाडय़ांना ६११ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्यावरून यंदाच्या पाणीटंचाईचे भीषण चित्र समोर येत असून उन्हाळ्याचे आणखी दोन महिने जायचे आहेत. शिवाय पाऊस वेळेवर पडेल की नाही याची शाश्वती नसल्याने पाणीटंचाईचा तडाखा ग्रामीण भागाबरोबरच मुंबई व इतर शहरी भागांनाही बसण्याची चिन्हे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button