ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन
पुणे : मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचं आज निधन झालं. अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी रंगभूमीवर त्यांनी ठसा उमटविला होता. त्यांनी ‘पार्टी’ या हिंदी सिनेमात अभिनय केला होता. तर ‘शेजारी शेजारी’ आणि ‘ताईच्या बांगड्या’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता.
प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरुची मावशी’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ ही नाटकं विशेष गाजली. मराठी रंगभूमीवर करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा उद्या अमेरिकेहून आल्यानंतर पुण्यात त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील.