जेईई ऍडवान्स’ परीक्षेत रॅंकर्सचा टक्का घसरला

– पुण्याचा अनुज श्रीवास्तव देशात 25 वा
– आयआयटीची परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन
पुणे – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या देशभरातील संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई ऍडवान्सड परीक्षेचा निकाल रविवारी सकाळी जाहीर झाला. यंदा परीक्षेतील रॅंकर्सची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत एक तृतीयांश घटल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी सर्व विभागांचे जवळपास 50 हजार विद्यार्थी ऑल इंडिया रॅंकमध्ये होते. मात्र, यंदा ही संख्या कमालीची घटली असून फक्त 18 हजार विद्यार्थी ऑल इंडिया रॅंकमध्ये आल्याचे क्लासचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुण्याचा अनुज श्रीवास्तव देशात 25 वा, तर अर्जुन काशेट्टीवार 33 वा आला आहे.
देशभरात 20 मे रोजी झालेल्या जेईई ऍडवान्सड परीक्षेसाठी जवळपास 1.55 लाख विद्यार्थ्यांपैकी 1200 विद्यार्थी पुण्यातील होते. जेईई ऍडवान्सड 2018 परीक्षेचा कट ऑफ 126 गुणांचा असून तो 35 टक्के म्हणजे 2017 इतकाच आहे. सर्व विभागांना एकत्र करून जवळपास 18 हजार 148 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रॅंक मिळाला आहे.
जेईई ऍडवान्सड 2018 च्या निकालाबद्दल बोलताना आयआयटी-पीचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, गेल्या 58 वर्षांत पहिल्यांदाच आयआयटीची परीक्षा ऑनलाइन घेतली गेली आणि 40 टक्के प्रश्न हे “न्यूमरिकल व्हॅल्यू’ प्रश्न या नवीन पॅटर्न वर आधारित होते. 2006- 2017 पर्यंत असलेल्या इंटिजर पद्धतीच्या प्रश्नांपेक्षा या न्यूमरिकल व्हॅल्यू प्रश्न पद्धतीमध्ये 25 पट अचूकपणा गरजेचा होता. यामुळे 2017 च्या तुलनेत विशिष्ट रॅंकसाठी लागणाऱ्या गुणांमध्यें 12 टक्के घसरण झाली आहे.
मुलींसाठी समुपदेशनावर आधारित 14 टक्के जागा राखीव असण्याचे हे पहिलेच वर्ष आहे आणि म्हणून समुपदेशन प्रक्रियेदरम्यान जास्त विद्यार्थिनींचा रॅंक घोषित होईल, असा अंदाज आहे.
पुण्यातील यशवंत विद्यार्थी (कंसात रॅंक)
अनुज श्रीवास्तव (25), अर्जुश काशेट्टीवर (33), अथर्व दातार(200), प्रणव पागे (275 ), अद्वैत पडवळ (428), अमोल शहा (459), शौनक नटराजन (473), व्ही.अनिरुद्ध (536), मुक्ता वागळे, अद्वैत पडवळ (812), पार्थ पराडकर (933), आदित्य पुसलकर (956), अमेय कुलकर्णी (986).