जुन्नरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे – निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यात मोठा शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नरमधील नारायणगावाजवळील अभंग वस्तीत हा शस्त्रसाठा सापडला. दहशतवादविरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी हा शस्त्रसाठी पकडला.
अभंग वस्तीतील राजाराम किसन अभंग (60) यांच्या शेतातील पडक्या घरात हा शस्त्रसाठा सापडला. यामध्ये 5 पाईप बॉम्ब, कट्टे आणि रिव्हॉल्वरसह तलवार आणि धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा शस्त्रसाठा जप्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
काल रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. राजाराम अभंग यांच्या पडक्या घरात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पुणे एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
2004 मध्येही राजाराम अभंगला बॉम्ब बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याच्या घरात शस्त्रास्त्र सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.