जीव गेल्यावर आपत्ती व्यवस्थापन करणार का ?

पुणे : मुसळधार पावसाने मुठा नदीत पाणी वाढून स्तर उंचावत आहे. त्यामुळे कमी उंचीच्या पुलाखाली व आसपास पाणी साचत आहे. येथे अजूनही रस्त्यावर साहित्य विक्री करणारी कुटूंब जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, बुधवारी सायंकाळच्या पावसाने नदीत पाणी वाढून डेक्कन येथील भिडे पुलाजवळ फुगवटा निर्माण झाला. त्यात नदीपात्रात राहणाऱ्या 2 कुटूंबाचे साहित्य वाहून गेले. हे नागरिक वेळीच बाहेर निघाल्याने अनर्थ टळला. या प्रकारामुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच असल्याचे समोर आले आहे.
अचानक आलेल्या पावसाने मुठा नदीच्या पाण्याला फुगवटा
– रस्त्यालगत राहणाऱ्या कुटूंबाचा संसार पाण्यात
का निर्माण होत आहे फुगवटा?
शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांत सर्वत्र पाणीचपाणी होत आहे. हे पाणी गटारे तसेच नाल्यांमधून नदीत येत आहे. तर महापालिका हद्दीत नदी ज्या गावामधून प्रवेश करते, तेथील कचरा डेपो नदीपत्रातच आहेत. त्यामुळे या पाण्याने हा कचरा वाहत येत असून तो कमी उंचीच्या पुलांखाली अडकत आहे. त्यात भिडे पूल, ओंकारेश्वर पूल तसेच टिळक पुलाचा समावेश आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबत असून त्या भागात फुगवटा निर्माण होत आहे. त्यामुळे धरणातून पाणी न सोडताही हे पाणी नदीकाठावर येत आहे.
संसार साहित्य वाचविण्याची धडपड
भिडे पुलाखाली तसेच नदीपात्रात रस्त्यावर साहित्य विक्री करणारी अनेक कुटूंब आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. बुधवारी हे नागरिक पत्रे आणि बांबूंच्या राहुट्यांमध्ये असताना अचानक पाणी वाढले. त्यामुळे मिळेल ते साहित्य घेऊन हे नागरिक रस्त्यावर आले. तर पाण्या वाहून गेलेले साहित्य लहान मुलांना सोबत घेऊन या महिला आपला संसार पुन्हा जमा करत होत्या.
——————-
स्थलांतरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष
नाल्यांवरील अतिक्रमणे आणि सिमेंट रस्त्यांमुळे थोडा पाऊस झाला, तरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी येते. त्यामुळे पावसाळा सुरू होताच नदीच्या आसपास तसेच पुलाखालील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. पाऊस सुरू झाल्याने या कुटूंबांना स्थलांतरित करणे आणि ती पुन्हा येणार नाहीत, याची खबरदारीही घेणे आवश्यक होते. मात्र, पालिकेने अजूनही पाऊल उचचलेले नाही. नागरिकांचा जीव गेल्यावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
——
मेट्रो कामगार झोपड्याही तशाच
नदी पात्रात मेट्रो प्रकल्पासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. त्याच्या कामगारांच्या निवासाची सोय म्हणून झेड ब्रिज आणि ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्रतच झोपड्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे अचनाक मोठा पाऊस होऊन नदीत पाणी आल्यास या कामगारांच्या जीवाला धोका आहे. तसेच नदीच्या प्रवाहालाही अडथळा निर्माण होणार आहे. या कामगारांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास सोय उपलब्ध करणे आवश्यक आहे.