जामीन मिळण्यासाठी पोलिसांना शिवीगाळ

पिंपरी – मारहाण करून गंभीर जखमी करण्याच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातील मुलाला जामीन मिळवून द्यावा, यासाठी आईने पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी सायंकाळी थेरगाव पोलीस चौकीत घडली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केगार यांनी फिर्याद दिली आहे. महिला आणि पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेच्या मुलाला पोलिसांनी मारहाण आणि गंभीर दुखापत केल्याने अटक केली होती. त्याची आई व अन्य नातेवाईक मुलाच्या जामिनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पोलिसांचा अभिप्राय आवश्यक असतो. जामीन मिळेल, असा अभिप्राय पोलिसांनी द्यावा, अशी आरोपी महिलेची इच्छा होती. त्यासाठी आरोपी महिला व पुरुष थेरगाव पोलीस चौकीत गेले. तेथे आरोपी महिलेने फिर्यादी पोलीस अधिकारी यांना अर्वाच्य भाषा वापरुन उद्धट वर्तन केले.
आपल्या मुलाचा जामीन झालाच पाहिजे, नाही तर बघून घेईल, असा दम देत पोलिसांच्या अंगावर धावून गेली. दुसऱ्या आरोपीनेही फिर्यादी यांना फोन करून तुमची तक्रार पोलीस आयुक्तांना करतो, अशी धमकी दिली व अपशब्द वापरले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. आर. स्वामी करीत आहेत.