जागतिक मधुमक्षिका दिनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा विश्व विक्रम

“हनी मिशन’ अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार
एका दिवसात मधमाशांचा 841 पेट्या वितरीत
मुंबई – 21 मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एका दिवसात सर्वाधिक मधमाशी पेट्या वितरीत करण्याचा विश्व विक्रम आज नोंदवला. दोन वर्षांपूर्वी इस्रायलने मधमाश्यांच्या 841 पेट्यांचे वितरण केले होते. आज काझिरंगा वन क्षेत्रात मधमाश्यांच्या एक हजार पेट्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मधुर क्रांती’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोगाने “हनी मिशन’ हाती घेतले आहे. त्या अंतर्गत नोव्हेंबर 2018 पर्यंत मधमाश्यांच्या 1 लाख 30 हजार पेट्यांचे वितरण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. गुजरातच्या नर्मदा खोऱ्यापासून आसामच्या काझिरंगा वनक्षेत्रापर्यंत आणि जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागापासून मैसूरच्या घनदाट जंगलांपर्यंत या पेट्यांचे वितरण केले जाणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून युवकांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. मधमाश्यांची वसाहत ओळखण्यापासून संबंधित यंत्रणांचा योग्य उपयोग मधमाश्यांच्या शत्रुंचा नायनाट तसेच सर्व ऋतुंमध्ये मधमाश्यांचे योग्य पालन पोषण आणि उत्पादन प्रक्रिया अशा सर्व बाबींचा समावेश या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आला आहे. काझीरंगामधील कोहेरा गावात संकरदेव शिषु निकेतनमधील 500 शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 200 ग्रॅम मधाच्या बाटल्या वितरीत करण्यात आल्या. तसेच जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त देशभरात मधाच्या 25 हजार बाटल्यांचे वितरण करण्यात आले.
काझिरंगा क्षेत्रात आज वितरीत करण्यात आलेल्या मधमाश्यांच्या पेट्यांपासून तब्बल 30 हजार किलो उच्चप्रतिचा मध प्राप्त होणे अपेक्षित असून, त्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवक आणि युवा नव उद्योजकांना संधी प्राप्त होणार असल्याची माहिती आयोगाने दिली. आसाममधील आदिवासींसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, तसेच काझिरंगामधील वन संपत्तीतही मधुमक्षिका पालनामुळे भर पडेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला.