breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘जलयुक्त शिवार’चा पर्दाफाश, बीडमध्ये 4 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वकांक्षी योजनेचा बीडमध्ये पर्दाफाश झाला आहे. जलयुक्त शिवार योजनेत सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने तब्बल 4 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 24 सरकारी अधिकाऱ्यांना अटक केले असून 19 अधिकारी फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. ‘मुंबई मिरर’ या दैनिकाने हे वृत्त दिलं आहे.

फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांच्या या महत्त्वकांक्षी योजनेचा बीडमध्ये फज्जा उडाला. या योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी तब्बल 24 सरकारी अधिकारी आणि 139 ठेकेदारांवर 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपींनी बीडमधील परळी तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी करताना हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचा आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले.

883 मंजूर कामांपैकी 307 कामांची पाहणी

दरम्यान, बीडमधील जलयुक्त शिवार कामांमध्ये  घोटाळा झाल्याचा पहिला आरोप 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकाने याची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांनी 883 मंजूर कामांपैकी 307 कामांची पाहणी केली. त्यावेळी ही कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं नमूद केलं.

‘कामात घोटाळा केलेल्या निधीची वसूल करावी’

ऑक्टोबर 2017 मध्ये दक्षता पथकाने दिलेल्या अहवालात म्हटले, “या कामात सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने घोटाळा केला. त्यामुळे 26 ठिकाणच्या कामांचा 100 टक्के, 139 कामांचा 50-90 टक्के, 50 कामांचा 20 ते 50 टक्के, 41 कामांचा 5-20 टक्के आणि 51 कामांचा 0.5 टक्के निधी वसूल केला जावा.”

या चौकशीत हेही उघड झाले की मंजूर कामांपैकी 17 कामांचे तर कोणतेच काम झाले नव्हते. दक्षता पथकाच्या या अहवालानंतर मार्च 2018 ला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याव्यतिरिक्त औरंगाबाद विभागीय आयुक्तांनीही मूल्यांकन न झालेल्या 576 कामांपैकी 10 टक्के कामांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यातून योजनेत आणखी काही घोटाळा झाला आहे का? हे तपासण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button