जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट

- 20 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची शक्यता
श्रीनगर – नियंत्रण रेषा पार करत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली असून जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीमधून सुमारे 20 दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे.
घुसखोरी करणारे दहशतवादी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे असल्याचे वृत्त आहे. या दहशतवाद्यांकडून पवित्र रमजान महिन्यात काश्मीरमध्ये घातपात घडविण्याची शक्यता वर्तविण्यातयेत आहे. खासकरून काश्मीर खोऱ्याला लक्ष केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून राज्यातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरूनच पाकिस्तानात बसलेले हॅण्डलर्स काश्मीरमध्ये हिंसा घडत राहावी यासाठी किती प्रयत्न करत आहेत हे दिसत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आमदार मुश्ताक शहा यांच्या निवासस्थानावर हल्ला
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी आज दोन ग्रेनेड हल्ले केले. त्यात पीडीपीचे आमदार मुश्ताक शाह यांच्या पुलवामा येथील निवासस्थानावर दहशतवाद्यांनी आज गोळीबार केला. या घटनेत लॉनमध्ये स्फोट घडविण्यात आला. मात्र, यात कोणीही जखमी झाले नाही. सुदैवाने या घटनेच्या वेळी आमदार सदनिकामध्ये नव्हते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिले.
अनंतनाग जिल्ह्यातील खानबाल येथे आज दुपारी अतिरेक्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांसह चार जण जखमी झाले.