छगन भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
जामीनानंतरची कागदोपत्री प्रक्रिया आज पूर्ण
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजुर केल्यानंतर आज त्यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया तुरुंग अधीक्षकांनी केईएम रुग्णालयात जाऊन पूर्ण केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लॉंडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून अटकेत होते.
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते आता डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, दोन वर्षे कारागृहात असलेले छगन भुजबळ बाहेर पडत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचे वय लक्षात घेत जामीन मंजूर करण्यात आला. भुजबळांना पाच लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणे, साक्षीदारांना प्रभावित न करणे, या अटींवर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लॉंडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती.