चौकीदाराची चौकशी करणार, जेलमध्ये टाकणार- राहुल

नागपूर – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका सुरू केला असून आज नागपूर येथे पहिल्याच प्रचारसभेत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ‘चौकीदार’ शब्दावर बोट ठेवत निवडणुकीनंतर या चौकीदाराची चौकशी होईल आणि चौकीदार जेलमध्ये असेल, असा इशारा राहुल यांनी दिला. काँग्रेस सत्तेत आल्यास दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणाही राहुल यांनी केली.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी नागपुरातील कस्तूरचंद पार्कात राहुल गांधी यांची जाहीर सभा सुरू आहे. या सभेतून राहुल यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रकाश टाकतानाच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेसने जाहीरनाम्यात गरिबांसाठी न्याय योजनेची घोषणा केली आहे. त्याकडे लक्ष वेधताना काँग्रेसने गरिबीवर सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्धार केला आहे. गरिबांच्या खात्यात दरमहा १२ हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षांत सुमारे ३ लाख २० हजार रुपये जमा केले जाणार आहेत, असे राहुल यांनी स्पष्ट केले.