चोरी करताना मज्जाव केल्याने चोरट्यांनी लावली रद्दीला आग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच ते सहा जणांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकाला दमदाटी करत चिंचवड एमआयडीसीच्या रिकाम्या खोलीतील रद्दीला आग लावली. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे ही घटना घडली.
पिंपरीच्या भाटनगर येथील ओल्ड वॉटर पंपच्या आवारात एमआयडीसीमधील कर्मचाऱ्यांचे क्वार्टर आहे. याठिकाणी रिकाम्या असलेल्या तीन खोल्यांमध्ये चिंचवड एमआयडीसी कार्यालयातील रद्दी ठेवली आहे. बुधवारी दुपारी पाच ते सहा तरुण त्याठिकाणी रद्दीची चोरी करण्यासाठी आले होते. रेल्वे लाईनच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या मारून क्वार्टर परिसरात येताच सुरक्षारक्षकाने त्यांना जागीच रोखले. त्यावर तरुणांनी सुरक्षारक्षकाला दमदाटी केली. त्यानंतर रद्दीला आग लावली.
अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.