चिखली पोलीस ठाणे होणार सुरू
पिंपरी- चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे असण्याच्या मागणीने जोर धरला होता. राजकीय आणि प्रशासकीय अडथळ्यांना पार करत चिखली पोलीस ठाणे सुरू होण्याच्या बेतात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन आयुक्तालय लवकरच सुरू होणार आहे, त्याच वेळी हे नवीन चिखली पोलीस ठाणे देखील सूरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे ग्रामीणमधून चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी हा परिसर मागील काही वर्षांपूर्वी पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत जोडण्यात आला होता. मात्र, या भागातील गुन्हेगारी वाढतच आहे. त्यामुळे या भागाला स्वतंत्र पोलीस ठाणेच हवे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीने चांगलाच जोर धरला. शासकीय पातळीवर पोलीस ठाण्यास मान्यता मिळाली असून चिखली येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत हे नवीन पोलीस ठाणे सुरू होणार आहे.
चिखली पोलीस ठाण्यात निगडी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग देण्यात येणार असून या दोन पोलीस ठाण्यांमधून आणि पोलीस मुख्यालयाकडून फौजफाट्याची गरज भागवली जाणार आहे. त्यामुळे नवीन आयुक्तालयात पूर्वी 15 पोलीस ठाण्यांचा समावेश होता. आता चिखली पोलीस ठाणे सुरू झाल्यास त्यात एका ठाण्याची भर पडणार आहे.