चिखली – कुदळवाडीतील २० गोदामे खाक

चिखली – कुदळवाडीत मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या आगीत भंगार मालाची सुमारे वीस गोदामे जळून खाक झाली. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात काही अंशी यश आले. मात्र, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे आग धुमसत राहिल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथील चौधरी वजनकाट्याच्या मागील बाजूस मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एका भंगार मालाच्या गोदामाला आग लागली. वाऱ्यामुळे एका गोदामातून दुसऱ्या गोदामात आग पोचली. लाकूड आणि प्लॅस्टिक माल तसेच भंगारातील कचरा असलेली सुमारे वीस गोदामे आगीत भस्मसात झाली. दरम्यान, अग्निशामक दलाचे पाच बंब आणि दहा पाण्याच्या टॅंकरच्या साह्याने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. लाकडी समान आणि प्लॅस्टिक कचरा यामुळे मोठ्या परिसरात आग पसरली गेली होती. बुधवारीही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नगरसेवक दत्ता साने म्हणाले, ‘‘भंगार मालाची अनधिकृत गोदामे महापालिकेने त्वरित हटवावीत. सततच्या आगींमुळे परिसरात प्रदूषण पातळी वाढली आहे. नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत हरित लवादाकडे दाद मागणार आहे.’’
आगी लावण्यात येतात?
कुदळवाडी परिसरात आगी लागत नाहीत, तर लावल्या जातात. व्यवसाय तोट्यात गेल्यावर किंवा देणेकऱ्यांचे देणे थकल्यावर काही भंगार मालाचे व्यापारी गोदामांना आगी लावतात. त्यामुळे जवळपासची गोदामेही आगीत सापडतात. असे प्रकार त्वरित थांबविणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.