Uncategorizedपिंपरी / चिंचवड

चिंचवड व्यासपीठच्या पुढाकाराने आजपासून ‘नमामि पवनामाई’ अभियान

आपले पवनाकाठाचे चिंचवड शहर ते महानगर’ या विषयावर परिसंवाद 

पिंपरी: पवना नदीला स्वच्छ व सुंदर नैसर्गिक रुप प्राप्त करण्यासाठी चिंचवड व्यासपीठच्या वतीने  ‘संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलुया वाटा खारीचा’ या संकल्पनेतून शहरातील विविध संस्था, गणेश मंडळे, उद्योजक यांच्या सहकार्याने पवना नदीच्या स्वच्छतेच्या दुस-या टप्याला आज (शुक्रवार) पासून सुरूवात करण्यात येणार आहे.
 चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ‘नमामि पवनामाई’ची आरती आणि ‘आपले पवनाकाठाचे चिंचवड शहर ते महानगर’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यावेळी विद्या विघ्नहरी देव महाराज, गिरीश प्रभुणे, माजी नगरसेवक मधु जोशी, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत.
 पहिल्या टप्यामध्ये श्री मोरया गोसावी मंदिरालगत थेरगाव पूल ते धनेश्वर पूल दरम्यानच्या पवनानदी पात्रातील अडथळे, पुलाच्या कामानंतर पडलेले बांधकामाचे साहित्य, राडारोडा, गाळ, जलपर्णी हे 70 टक्के काम करण्यात आले होते. यासाठी पोकलँड मशीन, जेसीबी, डंपर, पाण्यावर तरंगणारे फ्लोटींग मशीन आणि बोटीची मदत घेण्यात आली होती. या कामाचा पुढील टप्पा नदीचे पावित्र आहे. त्याला उद्यापासून सुरवात केली जाणार आहे.
 याबाबत अधिक माहिती पवनानदी स्वच्छता अभियानचे निमंत्रक गजानन चिंचवडे म्हणाले, नदी काठी गाव, शहरे वसली, वाढली आहेत. नदीला आई म्हणून संबोधितो, तिला पुजतो. केंद्र सरकारने गंगा नदीचे पावित्र्य आणि महत्व ओळखून गंगानदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील मुळा-मुठा नद्या देखील नदीसुधार योजनेत पुनरुज्जीवीत होणार आहेत. केंद्र व  राज्य सरकार सर्वच नद्यांचे एकाच वेळी पुनरुज्जीवन करु शकत नाहीत, हे लक्षात घेऊन हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.
 भविष्यात 100 टक्के नदीचे वाहते पात्र स्वच्छ व सुंदर व्हावे. श्री मोरया गोसावी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील पूर्वीचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचेही चिंचवडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button