चिंचवडमध्ये तक्रारदाराला बेदम मारहाण

पिंपरी – महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिल्याने सामाजिक कार्यकर्त्याला अज्ञात तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच अर्वाच्य शब्द वापरात त्याला गंभीर दुखापत केली. ही घटना शनिवारी (दि. 12) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिंचवड मधील मोहननगर येथे घडली.
सचिन उद्धव शिंदे (वय 35, रा. यशवंत कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे शनिवारी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांना परत येण्यास उशीर झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास मोहननगर मधून जात असताना एक्साईड बॅटरी सुग्रीव कंपनी समोर आले असता अज्ञात तिघांनी त्यांना अडवले. ‘तूच का सचिन शिंदे, तुला लय माज आला का, तूच महापालिकेच्या अधिका-यांच्या विरोधात कोर्टात केस केली आहे.’ असे म्हणून तिघांनी शिंदे यांना मारहाण केली. लाकडी दांडक्याचा मार लागल्याने त्यांच्या पायाची चार बोटे फ्रॅक्चर झाली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.