Views:
118
पुणे – शहर पोलीस दलात भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी झालेल्या पात्र उमेदवारांची मंगळवारी लेखी परीक्षा पार पडली. पोलीस मुख्यालयात सकाळी 6 वाजल्यापासूनच परीक्षा घेण्यात आली. या वर्षी शहर पोलीस दलात भरतीसाठी सुमारे 48 हजार अर्ज आले होते. त्यापैकी 4 हजार 56 जणांनी लेखी परीक्षा दिली. तर, 234 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.
शहर पोलीस दलात यावर्षी 213 पोलीस शिपाई पदासाठी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी राज्यभरातून जवळपास 48 हजार अर्ज आले होते. 213 पैकी 10 जागा या बॅंडमॅन पदासाठी होत्या. त्यानुसार मागील महिन्यापासूनच उमेदवारांच्या चाचणीला सुरूवात झाली होती. शारीरिक चाचणीतून 4 हजार 290 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले गेले होते. परंतु यातील 234 जणांनी दांडी मारल्याने मंगळवारी एकूण 4 हजार 56 जणांनी लेखी परीक्षा दिली. तर बॅंडमॅनसाठी 156 जणांनी परिक्षा दिली. यामध्ये दोन मुलींचा समावेश होता. गृह विभागाने बॅंडमन पदासाठी मुलीही अर्ज करू शकतात असे सांगितल्यानंतर प्रथमच पुण्यातील भरतीत 2 मुलींनी या पदासाठी परीक्षा दिली.
भरती प्रक्रियेत सुरवातीच्या टप्प्यात छाती, उंची, लांब उडी अशी शारीरिक चाचणी घेण्यात आली. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने टप्प्याटप्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यानंतरच्या टप्प्यात 1600 मीटर धाव हा दुसरा टप्पा घेण्यात आला. शारिरीक चाचणीचे टप्पे पुर्ण झाल्यानंतर शेवटी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी लावण्यात आली. त्यानूसार सोमवारी पोलीस मुख्यालय येथे मुख्य लेखी परीक्षा कडेकोट बंदोबस्तात पार पडली.
234 उमेदवारांची लेखी परीक्षेला दांडी
शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी एकूण 4 हजार 290 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पोलीस मुख्यालयात झालेल्या लेखी परीक्षेत 234 उमेदवारांनी दांडी मारली. यामुळे 4 हजार 56 जणांनी लेखी परीक्षा दिल्याचे पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले.
Like this:
Like Loading...