breaking-newsपुणेमहाराष्ट्र

चांदणी चौक पुलाचा मार्ग अखेर मार्ग मोकळा !

आज 80 टक्‍के हस्तांतरण करणार : आयुक्त

पुणे – चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. या उड्डाणपुलासाठी महापालिकेने 80 टक्के भूसंपादन पूर्ण केले असून ही जागा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय)ला हस्तांतरित करण्यास सुरूवात झाली आहे.

महापालिकेकडून दि.22 ऑक्‍टोबरपासून संयुक्त मोजणी करून ही जागा “एनएचएआय’ला ताब्यात देण्यात येत असून 31 ऑक्‍टोबरपूर्वी 80 टक्के जागा देणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, उर्वरीत 20 टक्के जागा ही 20 नोव्हेंबरपूर्वी दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या चौकात उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. मात्र, या प्रकल्पाचा खर्च मोठा असल्याने महापालिकेकडून या प्रकल्पाचे काम “एनएचएआय’ला देण्यात आले. तर महापालिकेकडून भूसंपादन करून देण्यात येणार होते.

या पुलासाठी सुमारे 13.96 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता होती. त्यातील सुमारे जवळपास 11 हेक्‍टर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. या पुलाच्या कामासाठी आवश्‍यक 100 टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय, पुलाचे काम सुरू करणार नाही, अशी भूमिका “एनएचएआय’ने घेतल्याने सप्टेंबर-2017 मध्ये भूमिपूजन होऊनही काम सुरू झालेले नसल्याने प्रशासन तसेच भाजपला टीकेचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे सौरभ राव यांनी आयुक्‍तपदाचा पदभार घेतल्यानंतर या जागेच्या भूसंपादनासाठी तातडीने हालचाली करत राज्य शासनाकडून तब्बल 185 कोटींचे विशेष अनुदानही मंजूर करून आणले. यानंतर अखेर 80 टक्के भूसंपादन करण्यात प्रशासनास यश आले आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेऊन तातडीने काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेने “एनएचएआय’कडे केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत दि.22 ऑक्‍टोबर पासून महापालिका, “एनएचएआय’ तसेच या पुलाचे काम देण्यात आलेल्या “एनसीसी’ कंपनीकडून संयुक्त मोजणी करून आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी करून पुलासाठीची जागा ताब्यात घेतली जात आहे.

उर्वरीत जागा दि.20 नोव्हेंबरपर्यंत देणार

ही 80 टक्के जागा देतानाच उर्वरित 20 टक्के जागा 20 नोव्हेंबरपर्यंत हस्तांतरीत करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी “एनएचएआय’ला दिले आहे. तसेच याबाबतची कल्पना केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनाही देण्यात आली असून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात या उड्डाणपुलाचे काम सुरू केली जाण्याची शक्‍यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button