चंद्रकात पाटील म्हणजे “विनाशकाले विपरीत बुध्दी, युवानेते अमित बच्छाव यांची टिका

पिंपरी – औरंगाबाद येथे आंदोलनकर्ता काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन स्वतःला संपवून घेतले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असताना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढायचा प्रयत्न केला नाही. मराठा आरक्षणाबाबत कोणतीही सकारात्मक भुमिका न घेता उलट आंदोलकांना डिवचण्याचे काम सत्ताधा-यांकडून करण्यात येत आहे. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे सदर आंदोलन चिघळविण्याच्या हेतूने उलटसुलट विधाने करत सुटले आहेत. त्यामुळे चंद्रकात पाटील यांना “विनाशकाले विपरीत बुध्दी” असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरा उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
याबाबत बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासुन मराठा क्रांती मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी झगडत आहेत. सरकार आणि शासनाकडून वेळोवेळी फक्त आश्वासन दिले जात आहे.त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सत्ताधा-यांनी खुर्च्या खाली कराव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत मराठा समाजावर गंभीर आरोप लावले होते. तर, दुसरीकडे चंद्रकांत पाटिल,आमदार प्रशांत बंब यांच्याकडून आंदोलकांबाबत चुकीच्या पध्दतीने आरोपांच्या फैरी झोडल्या जात आहेत.
त्यामुळे सरकारला नेमके काय अपेक्षित आहे. असा प्रश्न उपस्थित होत असून अशा बेताल वक्तव्यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावले उचलण्याची गरज होती. परंतु विठ्ठल पूजेच्या निमित्ताने वारकऱ्यांना त्रास होईल, अशी साप सोडण्याची विधाने त्यांनी केली. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या बेजबाबदार विधानांची भर पडली व त्यामुळे बहुसंख्य घटकांचा संताप अनावर झाला आहे. परिस्थिती चिघळण्यास ही मंडळीच जबाबदार आहेत, असे बच्छाव यांनी म्हटले आहे.