breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

घाबरू नका! महाराष्ट्रात निपाह विषाणू नाही

मुंबई – केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे अकरा जणांचा मृत्यु झाल्यामुळे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मात्र, आपण घाबरू नका!

केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्‍टरांशी तातडीने संपर्क साधावा. तसेच या विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या केरळमधील कोझीकोडे व आसपासच्या परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.

केरळमधील कोझीकोडेमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे केरळमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत आजारासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते.

या रोगासंदर्भात राज्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष (आयसोलेशन रुम) सुरु करण्यात आला आहे.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजिवकुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार आदि उपस्थित होते.

आजाराची लक्षणे…
निपाह विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेकुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. विशेषत: केरळ भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तिंमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

निपाह विषाणूचा प्रसार….
निपाह विषाणुचा प्रसार मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्‍यक असते.

प्रतिबंधात्मक खबरदारी…
डॉक्‍टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण उपचार आणि शुश्रूषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वत्रिक खबरदारीनुसार आवश्‍यक काळजी घ्यावी. शेतात, जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे. निपाह विषाणू आजाराच्या रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे.

सर्वप्रथम मलेशियात
निपाह विषाणू 1998मध्ये सर्वप्रथम मलेशियात आढळला. भारतात 2001मध्ये प. बंगालमधील सिलिगुडी, तर 2007 मध्ये नाडियामध्ये या विषाणूचा उद्रेक यापूर्वी झाला होता. बांगला देशात या आजाराचा उद्रेक दरवर्षी आढळून येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button