ग्वाटेमालातील ज्वालामुखीमध्ये 69 जण मृत्यूमुखी

एल रोदेओ (ग्वाटेमाला) – ग्वाटेमालामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या 69 वर पोहोचली आहे. या ज्वालामुखीमुळे लागलेल्या आगीत अनेक घरे आणि जंगले जळून गेले आहेत. या आगीपासून वाचण्यासाठी इथल्या रहिवाशांना अवधीच मिळाला नाही. त्यामुळे कित्येकजणांचा होरपळून मृत्यू झाला.
फावडी आणि अन्य हत्यारांच्या सहाय्याने बचाव पथकाने घरांचे ढिगारे उपसले तेंव्हा पूर्ण जळून गेलेले मृतदेह समोर आले. या संपूर्ण परिसरामध्ये राख आणि धुमसणारे निखारे असल्याने बचाव आणि मदत कार्याला अडथळे येत आहेत. सापडलेल्या 69 मृतदेहांपैकी केवळ 17 जणांची ओळख पटू शकली आहे. या मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे, असे फॉरेन्सिक सायन्सच्या संचालकांनी सांगितले. एल रोदेओ येथे एक पार्टी सुरू असताना हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यानंतर झालेल्या पळापळीत अनेक जण रस्त्यावरच्या लाव्हाच्या चिखलात रुतून मरण पावले.
हा ज्वालामुखी अधून मधून खदखदत असतो. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे मृतांची संख्या जास्त आहे.