breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलं एकाच बनावटीचं पिस्तूल

बंगळुरु- पत्रकार गौरी लंकेश आणि कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये अजून एक समान धागा असल्याचं फॉरेन्सिकच्या अहवालात निष्पन्न झालं आहे. गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तूल एकाच बनावटीचं असल्याचं फॉरेन्सिकच्या प्राथमिक चाचणीत समोर आलं आहे. दोघांच्या हत्येसाठी 7.65 मिमी देशी बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आलं होतं. फॉरेन्सिकने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन बुलेट्स आणि काडतुसं ताब्यात घेतली होती.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार फॉरेन्सिकने गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा-या विशेष तपास पथकासोबत ही माहिती शेअर केली आहे.

‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या.

तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या बुलेट्स आणि काडतुसांवर असणा-या बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना कलबुर्गी यांच्या हत्येवेळी सापडलेल्या बुलेट्स आणि काडतुसांशी केली. या दोन्ही हत्यांमध्ये संबंध असल्याचा संशय पोलिसांना होता. चाचणीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही हत्यांमध्ये एकाच बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आल्याचं नक्की झालं आहे. यामुळे या दोन्ही हत्यांमागे समान लोक सामील असण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

शहरं रक्ताळली… एनएच ४ डागाळला! योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट ?
दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा ‘नॅशनल हायवे क्रमांक चार’ सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला गेला आहे. पुणे, कोल्हापूर, धारवाड अन् आता बंगळुरू या चार शहरांत गोळ्या झाडून झालेल्या हत्या पाहता ‘हायवे’शी संबंधित हा योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात पाठीमागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दाभोलकर हे मूळचे साता-याचे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या सातारा शहरातील नागरिकांना चार वर्षांनंतरही दाभोलकर हत्येच्या वेदना लपविता आलेल्या नाहीत. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचीही सकाळी फिरायला गेल्यानंतर गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच कोल्हापूर शहर आहे. धारवाड येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही गोळ्या झाडूनच खून करण्यात आला. धारवाड हे शहरही पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरच वसले आहे. बंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांचीही गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. पुण्यातून निघालेला नॅशनल हायवे क्रमांक चार बंगळुरूमध्ये संपतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button