गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णखरेदीचा उत्साह

खरेदीचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शनिवारी बाजारात खरेदीच्या उत्साहाचे वारे संचारले होते. सोने-चांदीसह लग्नखरेदी, घरखरेदीने गुढीपाडव्याचा गोडवा वाढवण्यात आला. सोने खरेदीचे प्रमाण शनिवारी १० ते १५ टक्कय़ांनी वाढले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रामुख्याने सुवर्णखरेदी केली जाते. योगायोगाने सोन्याचा भाव ३२ हजारांखालीच राहिल्याने सुवर्णप्रेमींनी खरेदीची पर्वणी साधली. सोनसाखळ्या, अंगठय़ांसह अन्य आभूषणांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून गुंतवणूक करण्यात आली. चांदीचा किलोचा भावही ३८ हजारांखालीच राहिल्याने रजतरसिकांनीही भरपूर खरेदीची संधी साधली.
सोन्याच्या दराने २०१२ मध्ये उसळी घेतली होती; परंतु त्यानंतर मात्र ते तेवढय़ा प्रमाणात वाढले नाहीत. यंदाही त्यात वाढीचा उत्साह नव्हता. त्यामुळेच काही गुंतवणूकदारांनी बचतीला संधी दिल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सव्र्हिसेसचे सहयोगी उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले. सोन्याच्या दरातील किरकोळ वाढ आणि लग्नसराई यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीपेक्षा दागिने खरेदीत गुंतवणूक केल्याचेही ते म्हणाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीचे प्रमाण १० ते १५ टक्कय़ांनी वाढल्याचे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे यांनी सांगितले.
गृहखरेदीत उत्साह, वाहनखरेदीला कमी जोर
विकासकांनी घरविक्रीसाठी वाहनाबरोबरच करसवलतीच्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यांना भुलून काहींनी गृहखरेदीचा मुहूर्त साधला. घरांच्या स्थिर दरांना स्थिर रेडी रेकनर दराची साथ मिळाल्याने अनेकांनी घरनोंदणी केली. वाहनांच्या किमती वाढल्याने काहींच्या खरेदीच्या उत्साहावर विरजण पडले. तरीही काही उत्साही वाहनप्रेमींनी मुहूर्त साधून वाहन खरेदी केल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.